जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून सायंकाळीपर्यंत शहरात एकूण ५३.५९ टक्के इतके मतदान झाले आहे.
जळगाव शहर महापालिकेच्या ६३ जागांसाठी आज सकाळी ७:३० वाजता शहरातील विविध केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. दुपारपर्यंत मतदारांचा प्रतिसाद अत्यंत संथ होता, मात्र दुपारी ३:०० वाजेनंतर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. दुपारी ३:०० नंतर केंद्रांवर अचानक गर्दी वाढल्याने निवडणूक प्रशासनावर मोठा ताण पडला. मतदानाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, शहरात एकूण २,३४,९९६ मतदारांनी आपला हक्क बजावला.
यामध्ये १,२२,८५८ पुरुष मतदार, १,१२,१३३ स्त्री मतदार आणि ५ इतर मतदारांचा समावेश आहे. मतदानाची अधिकृत वेळ संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत असली, तरी दुपारी उशिरा सुरू झालेल्या गर्दीमुळे अनेक केंद्रांच्या गेटवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. ५:३० वाजेपूर्वी जे मतदार केंद्राच्या आवारात दाखल झाले होते, त्या सर्वांना मतदान करू देण्यात आले.















Discussion about this post