जळगाव । जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. यानंतर उन्मेष पाटील यांनी कट्टर समर्थक पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांना सोबत घेत शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवार मिळवून दिली. यामुळे भाजपच्या स्मिता वाघ यांच्यासमोर आव्हान उभे केले. या अनेपक्षित धक्क्यामुळे भाजपने पुन्हा स्मिता वाघ यांना पर्याय म्हणून माजी खासदार ए. टी. पाटील यांची उमेदवारीसाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे. ए. टी. पाटील यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याचीही माहिती मिळत आहे.
भाजपकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली?
जळगाव लोकसभा मतदारसंघात उन्मेष पाटील यांनी करण पवार यांच्यासह ठाकरे गटाची मशाल हातात घेतली. त्यामुळे स्मिता वाघ यांच्यासमोर भाजपमधील बंडखोरीतून तगडे आव्हान उभे राहिले आहे. परिणामी, वाघ यांच्या विजयाबाबत सांशकता निर्माण झाल्याने उमेदवार बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी उमेदवार बदलणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र मागील काही दिवसांत ए. टी. पाटील यांनी दिल्लीत भाजपश्रेष्ठींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. पाटील यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अॅड. रोहित पाटील यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरु आहे.