जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकारणाला वेग आला असून याच दरम्यान, पक्षाने तिकीट नाकारल्याने नाराज असलेले भाजपचे खासदार उन्मेष पाटील लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार अशा चर्चा आहेत. उन्मेश पाटील यांनी आज मंगळवारी आधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे ते लवकरच शिवसेना ठाकरे गटात करणार असल्याची चर्चा आहे.दरम्यान,
उन्मेष पाटील यांचा परफॉर्मन्स फार चांगला होता. अनेक वर्ष ते भाजपाचे काम करत आहेत. अनेक चळवळींशी ते जोडले आहेत. त्यांची प्रतिमा उत्तम आहे, तरी देखील भाजपने त्यांची उमेदवारी कापली. त्याबद्दल आम्हाला आश्चर्य आहे. ते अस्वस्थ आहेत हे नक्की. ते आम्हाला भेटलेत आणि चर्चा झाली आहे. आता ते पुन्हा उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्रीवर गेले आहेत, असं संजय राऊतांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यानंतर पुढील गोष्टी उद्यापर्यंत नक्की कळतील. आमची मैत्री फार जुनी आहे. त्यांची मन की बात त्यांनी सांगितलीये, त्यामुळे उद्यापर्यंत तुम्हाला सर्व समजेल, असंही संजय राऊत म्हणालेत.
उन्मेष पाटील यांच्यासह जळगाव जिल्ह्यातले शेकडो सहकारी त्यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात आहेत, असंही संजय राऊतांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं आहे.
वंचितबाबत बोलताना राऊतांनी पुढे म्हटलं की, आम्ही चर्चा बंद केलेली नाही, वंचितच्या नेत्यांनी बंद केली. आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव शेवटी दिलेला आहे. ते म्हणत असतील की आम्हाला तीनच जागांचा प्रस्ताव दिलेला आहे तर तसं नाही.
पाच जागांच्या प्रस्तावामध्ये अकोला सुद्धा आहे, रामटेक शिवसेनेची जागा असून देखील रामटेक, धुळे, मुंबईतील एक जागा देण्याच्या विचारात आम्ही होतो आणि पाचवी जागा सुद्धा त्यांच्यासाठी काढून ठेवली होती, असं राऊत म्हणाले.
Discussion about this post