निवडणूक बिनचूक पार पाडण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम
अधिकारी, कर्मचारी देणार परीक्षा, 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त तर मिळणार गुणवत्ता प्रमाणपत्र
जळगाव : भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. या लोकशाहीतला सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणूक, ती सार्वत्रिक निवडणूक 2024 आता देशभर सुरु आहे. या लोकसभा निवडणूक पार पाडण्यासाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागते. त्यातील मनुष्यबळाला योग्य ते प्रशिक्षण दिले जाते. त्यात कोणतीही चुक होऊ नये म्हणून जळगाव निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी चक्क सात टप्यात प्रशिक्षण ठेवलं आहे. त्या प्रशिक्षणाचा शेवट परीक्षेत होणार आहे…. आणि त्या परीक्षेला गुणांकन असणार आहेत. एवढेच नव्हे तर 70 टक्याच्या वरच्यांना गुणपत्रक देऊन गौरव केला जाणार आहे. ज्याला या पेक्षा कमी मिळतील त्यांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल. त्यामुळे या परीक्षेतून बाहेर पडणारा अधिकारी, कर्मचारी मात्र अख्या निवडणूक प्रक्रिया जन्मभर विसरणार नाही. असा हा अनोखा पॅटर्न अधिकारी, कर्मचारी यांच्या मध्ये विश्वास निर्माण करणारा ठरणार आहे.
कशी आहे ही प्रशिक्षण प्रक्रिया
या प्रशिक्षण प्रक्रियेतली पहिली पायरी आहे ते अध्यापन… निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीदरम्यान या निवडणूक प्रक्रियांतील प्रत्येक टप्याचा अत्यंत सूक्ष्मपणे या अध्यापन सत्रात समावेश असेल त्यात सर्वांनी सहभाग घेणे अनिवार्य आहे. अध्यापनाचे स्वरूप व्याख्यान मालिका , ऑडिओ / व्हिडीओ क्लिप, ऑनलाईन आणि ऑफलाईन संसाधनांचा तसेच निवडणूक आयोगाकडून प्रदान करण्यात आलेले हॅन्डबुक्सचा प्रक्रिया समजून घेण्यासाठी वापर करता येईल.च
चर्चासत्राच्या माध्यमातून
निवडणूक प्रक्रियेदरम्यानची आव्हाने समजून घेण्यासाठी नियम व कार्यपद्दतीबाबत चर्चा करा आणि केस स्टडीजचे विश्लेषण करा तसेच ही कार्यपद्दत्ती सहज सुलभ कळावी म्हणून छोट्या सत्रांमध्ये आपआपसात चर्चा करण्याचा टप्पा पण यात असेल.
शंकानिरसन सत्र
वरील सर्वबाबिंचा अभ्यास करून स्वयंशिक्षण मॉड्युल पूर्ण करून शंकानिरसन सत्राला उपस्थित राहा आणि आवश्यकतेनुसार मार्गदर्शनासाठी आणि स्पष्टीकरणासाठी हेल्पडेस्कचा वापर करण्याची मुभा यात असणार आहे.
प्रात्यक्षिकावर भर असेल
या प्रशिक्षणाच्या टप्यातील चौथा टप्पा हा प्रात्यक्षिकांचा असून निवडणुकीच्या पूर्वी आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व क्रियाकलपांच्या प्रात्यक्षिकांना उपस्थित राहून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स ( ई व्ही एम ) आणि इतर आवश्यक साधनांसह प्रात्यक्षिक सत्रांमध्ये सहभागी होणे अनिवार्य असेल.
मॉक ड्रिल
या मॉकड्रिल मध्ये प्रत्येक गटाला एक स्लॉट दिला जाईल जेणेकरून पूर्ण दिवसाच्या निवडणूक प्रक्रियांचे अनुकरण करता येईल हा त्यामागचा उद्देश असेल. एवढे करून न थांबता कौशल्य आणि तत्परता वाढविण्यासाठी सतत सराव करायचा आहे.
तोंडी परीक्षा
अध्यापन,चर्चा, प्रात्यक्षिक, मॉकड्रिल नंतर सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून आयोजित केलेल्या मूल्यांकनासाठी तयारी करायची आहे. या मूल्यांकनावेळी तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्यात निवडणुकीच्या दिवसातील कामांसाठी सज्ज असल्याबाबतची तयारी दाखवावी लागणार आहे.
परीक्षा आणि प्रमाणपत्र
हे सर्व सहा टप्पे संपल्यानंतर सर्वात शेवटचा टप्पा प्रशिक्षणाअंती आणि इव्हीएम/ व्हीव्हीपॅट वापराचे मूल्यांकन करण्यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यात निवडणूक कर्तव्यावरील प्रविण्य प्राप्त अधिकारी म्हणून 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. एवढे गुण मिळाले नाहीत तर पुन्हा प्रशिक्षणास हजर राहावे लागणार आहे. असा हा प्रशिक्षणाचा जळगाव पॅटर्न आहे. यातून कोणाकडून चुक होऊ नये निवडणूक प्रक्रिया बिनचूक व्हावी हेच अभिप्रेत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
या सर्व प्रक्रियेत अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे तसेच सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांचे योगदान आहे आणि असणार असल्याचेही आयुष प्रसाद यांनी यावेळी सांगितले.