बुलढाणा : वाळू वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळविले जात असल्यामुळे अनेकवेळा अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे. अशातच भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने झाडाखाली बसलेल्या दोघांना चिरडल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपर पेटविला.
बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव कडून येणाऱ्या टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दादुलगाव बसस्थानक परिसरात झाडाखाली बसलेल्या दोन इसमांना चिरडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात दादुलगाव येथील काशिनाथ झाल्टे (वय ४०) व समाधान काळे (वय ५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान मागील अपघाताच्या घटनेत संतप्त जमावाने माऊली फाटा येथे डंपरला आगीच्या स्वाधीन केले होते. आजच्या घटनेनंतर देखील जमाव संतप्त झाला होता. या संतप्त जमावाने दादुलगाव येथील अपघातग्रस्त डंपरला सुद्धा आग लावून पेटवल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने चालणाऱ्या या डंपरवर स्थानिक पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Discussion about this post