जळगाव । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून यात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून सातव्या फेरीत शिवसेना शिंदे महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांना ४१ हजार ६८८ मते मिळाली असून २१ हजार ९६० मतांची मोठी आघाडी घेतली आहे. तर माजी मंत्री गुलाबराव देवकर १९ हजार ९२८ मिळाली आहेत.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी सज्ज झाले होते. त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यानंतर महायुतीचे उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरले होते. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी मंत्री गुलाबराव देवकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले. सोबतीला मनसेने पक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंदा रोटे यांना उमेदवारी दिली.
प्रचाराच्या दरम्यान, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोठी चुरस पहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी हिरीरीने प्रचार केल्यामुळे येथील लढत ही अतिशय चुरशीची झाली. निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर कडाडून टिका करतांनाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. गुलाबराव देवकरांसाठी शरद पवार व एकनाथराव खडसे यांनी तर गुलाबराव पाटलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या. या मतदारसंघातून ६९.३३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता.















Discussion about this post