जळगाव । जगभरातील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे सोन्यात गुंतवणुकीचा ओघ वाढतच असल्यामुळे जळगावमधील सराफ बाजारातही सोने दराने नवा विक्रम नोंदवला.
बुधवारी सोन्याचे दर उच्चांकी प्रति तोळा ९१ हजार ८७६ रूपये आणि चांदी प्रति किलो एक लाख पाच हजार ६० रुपयांपर्यंत पोहोचली. जळगावमध्ये १४ मार्च रोजी उच्चांकी ९१ हजार ४६४ रुपयांपर्यंत पोहोचलेले २४ कॅरेट सोन्याचे दर नंतरच्या तीन-चार दिवसात थोडे खाली आले होते. मात्र, मंगळवारी पुन्हा मोठी दरवाढ झाली होती. त्यात बुधवारी ४०० रुपयांनी वाढ नोंदवण्यात आल्यानंतर सोन्याने ९१ हजार ८७६ रुपये प्रति तोळा असा नवा उच्चांक प्रस्थापित केला.
दरात सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेता सोने आगामी दिवसात एक लाख रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post