जळगाव : शहरातील बळीराम पेठेतील एजीएम प्लाझामध्ये घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केल्याची घटना शहरातील बळीराम पेठेतील एजीएम प्लाझामध्ये उघडकीस आली.या घटनेत चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक तोडून 1 लाख 60 हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण 4 लाख 14 हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बळीराम पेठेतील ए.जी.एम. प्लाझा अपार्टमेंटमध्ये मुजाईद खान अय्यूब खान हे वास्तव्यास आहे. ते उस्मानिया पार्कमध्ये त्यांच्या बहिणीकडे गेले होते.
घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी मुजाहिद यांच्या घरातून 1 लाख 60 हजारांची रोकड, 25 ग्रॅम वजानाचा सोन्याचा हार, 10 ग्रॅमचे सोन्याचे कर्णफुले, 15 ग्रॅम पोत, 10 ते 15 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या आणि मोबाइल असा एकूण 4 लाख 14 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला.
दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास त्यांचा भाऊ अबुबकार खान हा घरी आला असताना त्याला घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप दिसून आले नाही, तसेच घराचा दरवाजाही उघडाच होता. त्याने घरात जाऊन पाहणी केली असता, त्याला घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने त्याने घडलेली घटना मुजाहिद याला सांगितली. घटनेची माहिती मिळताच त्याने तत्काळ घराकडे धाव घेतली. यावेळी त्याला घरातील लोखंडी कपाटाचे लॉक हे वाकलेले दिसून आले. तसेच त्यातील सोन्याचे दागिने, मोबाइल दिसून न आल्याने घरात चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी त्वरित शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















Discussion about this post