जळगाव – प्रत्येक सरळ उभ्या असलेल्या वस्तुची सावली पायापाशी पडते याला शून्य सावली दिवस असे म्हणतात. आज 25 मे रोजी 12 वाजून 24 मिनीटे व 45 सेकंदांनी सूर्य डोक्यावर आल्यामुळे जळगाव शहरातील अनेक नागरिकांनी रस्त्यावर तसेच ज्या ठिकाणी ऊन येते अशा ठिकाणी उभे राहून आपली सावली पायापाशी असल्याचा क्षण अनुभवला.
सूर्य वर्षातून फक्त दोनच वेळेस आपल्या डोक्यावर येतो. सौर घड्याळानुसार (स्थानिक वेळ) 12 वाजता व हातातील घड्याळानुसार (भारतीय प्रमाण वेळ) 12 वाजून काही मिनिटांनी सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली इकडे तिकडे न पडता पायापाशी पडते. आपण उत्तर गोलार्धात विषुववृत्त आणि कर्कवृत्ताच्या मध्यभागी 21.00 अंश उत्तर या अक्षांशावर आहोत. असे प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते.
21 मार्च ते 21 जून या उत्तरायणाच्या काळात 25 मेस सूर्याचे डेक्लीनेशन आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते. 25 मे ला सूर्य 21.00 अक्षांशावर उगवतो. त्यादिवशी 12 वाजून 24 मिनिटे 45 सेकंद या वेळी सुर्य अगदी आपल्या डोक्यावर येतो. त्याची किरणे लंबरूप पडतात आणि आपल्याला शून्य सावलीचा क्षण अनुभवावयास मिळतो. हाच शून्य सावलीचा क्षण गुरूवारी जळगावकरांनीही अनुभवला.
Discussion about this post