जळगाव/मुंबई । ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात दहीहंडीच्या मुहुर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला प्रथमच पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसामुळे खरीप हंगामातील शेतीपिकांना मोठा दिलासा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून आज बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण,मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
तर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई, पुणे, ठाण्यासह पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या तसेच मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
Discussion about this post