जळगाव । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा बँकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा बँकेच्या चालू आर्थिक वर्षातील पीककर्ज थकीत असलेल्या सभासद शेतकऱ्यांना व्याजमाफी देऊन केवळ कर्जाची मूळ रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत ही सवलत मिळणार आहे. बँकेच्या या योजनेचा जिल्ह्यातील १ लाख ९० हजारावर शेतकऱ्यांना फायदा घेता येणार आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीने पिकांचे नुकसान झाल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांशी हा दिलासादायक निर्णय आहे.
जिल्हा बँकेने घेतलेल्या या निर्णयाबाबत जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. राज्यातील ३६ जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये शेतकऱ्यांना व्याजमाफी देण्याचा निर्णय घेणारी जळगाव जिल्हा बँक ही एकमेव असल्याचेही त्यांनी सांगितले.
बँकेची १८ मार्च रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०२३ नंतर कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना ही व्याजमाफी मिळणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
जिल्ह्यात एकूण ८७६ विविध कार्यकारी सोसायटी आहेत. त्यापैकी ५५१ विकास संस्था अनिष्ट तफावतीत आहेत. त्यांच्याकडून ६४० कोटी रुपयांचे कर्ज बँकेला घेणे आहे. या योजनेमुळे विकासोंना ७० कोटी ४० लाख रुपयांचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे.















Discussion about this post