जळगाव : कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जळगाव जिल्हा बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ८६५ शेतकऱ्यांकडून तब्बल ६२ कोटी ३२ लाख रुपयांचे व्याज माफ करण्याची घोषणा बँकेकडून करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
तसेच, ३१ मार्चपर्यंत आपले कर्ज पूर्णपणे फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णयही बँकेने घेतला आहे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एप्रिल २०२५ मध्ये जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ८६५ शेतकऱ्यांनी एकूण १०७२.१५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. शासनाने दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यानुसार दोन लाखांच्या आतील थकबाकीदार ८१,३९४ शेतकऱ्यांकडे २७३.२७ लाख रुपयांचे कर्ज असून त्यावर १३७.०१ लाख रुपयांचे व्याज थकीत आहे.
दरम्यान, दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या १०,८६१ शेतकऱ्यांकडे २२६.५८ लाख रुपयांचे मुद्दल आणि ३२८.१० लाख रुपयांचे व्याज बाकी आहे. जिल्हा बँकेच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.















Discussion about this post