जळगाव । जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद याच्यासह जिल्ह्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अज्ञातांनी मुख्यमंत्री कार्यालयाला धमकीचे मेल पाठवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयास धमकीचा मेल प्राप्त झाला. खबरदारी म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाने हा मेल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना पाठवला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या केली जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यात दंगली घडविण्यात येतील. जळगावचे वरिष्ठ पोलिस अधिकारी भ्रष्ट असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावं अशा धमकीचा मेल मुख्यमंत्री कार्यालयाला अज्ञातांनी पाठवला आहे.
दरम्यान याप्रकरणाची गंभीर दखल घेत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. तर या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांना तपास करण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
Discussion about this post