जळगाव । जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातील दोन मातब्बर नेते आता अजित पवार यांच्या नेतृत्वात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर लवकरच हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या संभाव्य राजकीय बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचा औपचारिक पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
वास्तविक 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीत देखील शरद पवार यांच्या पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे आता स्थानिक पदाधिकारी आणि नेते पक्ष सोडून गेल्यास याचा फटका शरद पवार यांच्या पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपासून पक्षांतराची चर्चा
डॉ. सतीश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. आम्ही सध्या विरोधी पक्षात असल्याने कार्यकर्त्यांच्या समस्या मार्गी लागत नाहीत. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील काळात निर्णय घेण्यात येईल, असे मत सतीश पाटील यांनी व्यक्त केले होते. सतीश पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या पक्षांतराची चर्चा रंगली होती.
Discussion about this post