जळगाव । जळगाव जिल्ह्यात वाढत्या जुगाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून अशातच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव शहरातील ‘हॉटेल रॉयल पॅलेस’ येथे छापा टाकून एका रूममध्ये सुरु असलेला मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुरूवारी १० जुलै रोजी मध्यरात्रीनंतर हॉटेल रॉयल पॅलेस, जयनगर, सागरपार्क मैदानाजवळील रूम नंबर २०९ मध्ये काही व्यक्ती पैशांवर तीन पत्ती (झन्ना मन्ना) जुगाराचा खेळ खेळत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी पोउनि शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पो.हे.कॉ. अकरम याकुब शेख, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.हे.कॉ. प्रविण भालेराव, पो.हे.कॉ. संदिप चव्हाण, पो.ना. किशोर राजाराम पाटील आणि पो.कॉ. रविंद्र श्रावण कापडणे यांचा समावेश असलेले पथक तयार केले.
११ जुलै रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास पथकाने हॉटेल रॉयल पॅलेस गाठून खात्री केली. हॉटेलमधील रुम नंबर २०९ ही मदन लुल्ला याच्या नावावर आरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने छापा टाकला असता, तिथे ८ इसम जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून रोख १९ लाख ९७ हजार रुपये आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे १३ मोबाईल हँडसेट असा एकूण लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेल्या ८ जणांविरोधात सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीनुसार, रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.















Discussion about this post