जळगाव । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत दोन गटात दगडफेक करण्यात आल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. मेडिकल मालकाने मेडिकल दुकानावर काढण्याच्या रागातून दगडफेक झाल्याची माहिती समोर आली असून या दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ही संपूर्ण घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागात मेडिकल दुकानावर काम करणाऱ्या तरुणाला मेडिकल दुकानावरून मालकाने काढण्याच्या रागावरून रामेश्वर कॉलनी परिसरात दोन गटात टोळक्यांनी दगडफेक केली. यावेळी दहा ते बारा तरुणांच्या टोळक्याने दुचाकींवरून शिवीगाळ करीत तेथे उभ्या तरुणांवर अचानक दगडफेक करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात धावपळ सुरु झाली होती.
रात्रीच्या अंधारात झालेल्या दगडफेकीमुळे नागरिक भयभीत झाले होते. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन पळापळ सुरु झाली होती. घटनेची माहिती जळगाव एमआयडीसी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस येताच दगडफेक करणाऱ्या संशयित तेथून पसार झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील दहा ते पंधरा जणांना एमआयडीसी पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेत अटक केली आहे.
दोन गटातील तरुणांच्या दगडफेकीची घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती घेत सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताची ओळख पटवून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण पसल्याने रात्री उशिरा परिसरात दंगा नियंत्रण पथक व पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Discussion about this post