जळगाव । जळगाव शहरातून जाणारा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून याच दरम्यान खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील मानराज पार्क ते गुजराल पेट्रोलपंपादरम्यान एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन महिला जागीच ठार झाले. तर या घटनेत एक वर्षांचा मुलगा जखमी झाला असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खोटेनगरकडून मानराज पार्ककडे येणाऱ्या उड्डाणपुलाच्या उतरतीवरून दोन्ही महिला ह्या एक वर्षाच्या मुलाला सोबत घेवून दुचाकी क्रमांक (एमएच १८ एएस ५३७९ )ने जात असतांना त्यावेळी दुचाकीच्या मागे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही महिला जागीच ठार झाल्या तर सोबत असलेला चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दोघांचे मृतदेह शासकीय वेद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही महिलांचे नातेवाईक हे आयश हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या मुलाला बघण्यासाठी जात असतांना ही घटना घडली आहे. अपघात घडल्यानंतर पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, हेमंत निकम, ११२ चे दिपक राव यांनी सहकार्य केले.















Discussion about this post