जळगाव । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ असलेल्या वाईन शॉपमध्ये चोरट्यांनी डल्ला मारून ७० हजार रुपये रोख रकमेसह सुमारे १० लाख रुपये किंमतीची देशी आणि विदेशी दारूचे १२६ बॉक्स चोरून नेले. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
भुसावळ येथील रहिवासी असलेले अशोकशेठ नागराणी यांचे इच्छादेवी चौफुली परिसरात महामार्गालगत अशोका लिकर गॅलरी हे दुकान आहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवून आत प्रवेश केला. त्यांनी दुकानातील काउंटरमधील ७० हजार रुपयांची रोकड आणि विविध प्रकारची महागडी दारूचे मोठे बॉक्स लंपास केले. चोरी करताना चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्यासोबत डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) देखील चोरून नेला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असून फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने घटनास्थळावरून ठसे आणि इतर आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. शहराच्या मध्यभागी आणि नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी एवढी मोठी चोरी झाल्याने पोलीस यंत्रणेसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Discussion about this post