जळगाव : माल भरून गाडी कर्नाटकला जाणार असल्याने कामाच्या ठिकाणाहून जेवणासाठी घरी आला होता. जेवण झाल्यावर परतताना काळाने घाला घातला. दुभाजकावर दुचाकी आदळल्याने डोक्याला मार लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जळगावातून गेलेल्या महामार्गावर घडली. गणेश प्रकाश पाटील (वय ३६) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत असे की, जळगाव शहरातील आशाबाबा नगरात वास्तव्यास असलेला गणेश पाटील हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्यांच्याकडे मालवाहू ट्रक असून वाहन चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. दरम्यान २३ जानेवारीला सायंकाळी कर्नाटक जाण्यासाठी कंपनीतून मालाची गाडी भरली. यानंतर जेवणासाठी घरी आला होता. जेवण आटोपून आई- वडील, पत्नी व मुलाचा निरोप घेऊन रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीने गाडी लावलेल्या ठिकाणी जाण्यासाठी रवाना झाला.
गणेश हा शिवकॉलनीतून निघून महामार्गावर लागला. येथून थोड्या अंतरावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरुन जात असतांना दुचाकी दुभाजकावर आदळली. यामुळे फेकला जाऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परीसरातील नागरिकांनी गणेशला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Discussion about this post