जळगाव । भरधाव काँक्रीट मिक्सर वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे साहिल मोहम्मद खाटीक (२३, रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) हा तरुण ठार झाला.ही घटना जळगाव उमाळा गावाजवळ घडली. त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.
या घटनेबाबत असे की, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात राहणारा साहिल खाटीक हा तरुण (एमएच १९, ईक्यू ३१३२) या क्रमांकाच्या दुचाकीने मासे घेण्यासाठी जात होता. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १५, जीव्ही ५६३०) क्रमांकाच्या सिमेंट काँक्रीट मिक्सरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे साहिल रस्त्यावर पडला आणि मिक्सरने त्याला चिरडले, यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्याच्या दुचाकीचाही पूर्णपणे चुराडा झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने साहिलचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून साहिलला मृत घोषित केले. साहिलच्या अपघाताची बातमी तांबापुरा येथील घरी कळताच, त्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील तरुणांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली साहिलच्या पश्चात चार बहिणी, आई आणि वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे तांबापुरा परिसरात शोककळा पसरली आहे.
Discussion about this post