जळगाव । जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात झाला. शहरातील आकाशवाणी चौकात दांम्पत्यांच्या दुचाकीला ट्रकचा कट लागल्यामुळे दुचाकीवरील महिलेचा तोल जावून ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ट्रक चालकावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, चंपालाल आनंदराव पाटील (वय ५३, रा. साईनाथ नगर, भुसावळ) व रागिणी चंपालाल पाटील (वय ४५) हे दांम्पत्य भुसावळहून जळगाव शहरातील खोटेनगर भागातील एका रुग्णालयात उपचारासाठी येत होते. त्यात आकाशवाणी चौकात सायंकाळी ५.३० वाजता सिग्नल सुटल्यानंतर मजूर फेडरेशनच्या बाजूला चंपालाल पाटील यांच्या दुचाकीला ट्रकचा कट लागला. यामुळे दुचाकीवरील त्यांच्या पत्नी रागिणी पाटील या रस्त्यावर कोसळल्या, मात्र त्याचवेळी त्यांचा हात व पाय ट्रकच्या मागील चाकाखाली दाबला गेला. यामुळे त्यांच्या हाताला व पायाचा अक्षरश चेंदामेंदा झाला.
काही वेळातच वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून रागिणी पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्यव्यस्थ परस्थितीत उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून, महिलेची प्रकृती गंभीर आहे. चंपालाल पाटील हे सेवानिवृत्त सैनिक आहेत. नियमित तपासणीसाठी पत्नीसोबत ते जळगावला आले होते. रुग्णालयात पोहचण्याआधीच त्यांचा अपघात झाला. रागिणी पाटील यांना एक मुलगा असून, ते पुण्याला शिक्षण घेत आहे. तर मुलीची लग्न झाले असून, मुलीला काही दिवसांपुर्वीच मुलगी झाली आहे. नात झाल्यामुळे पाटील दांम्पत्य आनंदात होते.
Discussion about this post