जळगाव । जळगाव शहरातील कालिकामाता मंदिर चौकात डंपरने दुचाकीला धडक दिल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी रात्री ७.१५ वाजेच्या सुमारास घडली. योजस धीरज बऱ्हाटे (वय-९ रा.लीला पार्क, अयोध्या नगर) असे मयत मुलाचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिला.
योजस हा मुलगा आई-वडील आणि बहीण भक्ती धीरज बऱ्हाटे (वय १३) यांच्यासोबत अयोध्या नगरातील लीला पार्क परिसरामध्ये वास्तव्याला होता. बुधवारी २५ डिसेंबर रोजी त्यांचा भादली येथील मामा योगेश हरी बेंडाळे हे त्यांच्या घरी आले होते. संध्याकाळी जेवणाचे पार्सल घेण्यासाठी योगेश बेंडाळे हे सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास भाची भक्ती आणि भाचा योजस त्याच्यासोबत दुचाकीने कालिंका माता चौकातून जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत योजस बऱ्हाटे हा चिमुकला जागीच ठार झाला. आता त्याची बहीण भक्ती आणि मामा योगेश बेंडाळे हे किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच अजिंठा चौकात उभा असलेला डंपर संतप्त नागरिकांनी पेटवून दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे व त्यांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच अग्निशमन दलाला देखील बोलवण्यात आले होते.दरम्यान शासकीय रुग्णालयात बऱ्हाटे परिवाराने मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेची शनिपेठ पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या अपघातांच्या मालिकांमुळे नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले.















Discussion about this post