जळगाव । जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गावरील अपघाताचे सत्र थांबता थांबत नसून याच दरम्यान बुधवारी रात्री भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजेच दुचाकीस्वाराला ६० फुटांपर्यंत नेल्याने फरफटत नेले. यात दुचाकीस्वार विजय नामदेव भोई (४५, रा. आशाबाबा नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना शहरातील शिवकॉलनीनजीक झाला. दरम्यान, अपघातानंतर नागरिकांनी महामार्गावर उतरत संताप व्यक्त केला. यामुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
याबाबत असे की, विजय भोई यांची शिवकॉलनी थांब्याजवळ पान टपरी आहे. बुधवारी रात्री ते घरी जात असताना पाळधीकडून भुसावळकडे जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर दुचाकीला ६० फुटापर्यंत कंटेनरने ओढत नेले. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.
नागरिकांचा रास्ता रोको
महामार्गावर अपघातांचे सत्र सुरू असून बुधवारी रात्री पुन्हा अपघात होऊन एकाला जीव गमवावा लागला. अपघातानंतर नागरिक थेट रस्त्यावर उतरले व रास्ता रोको केला. वारंवार मागणी करूनही आवश्यक उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी जिल्हापेठ पोलिस पोहोचले व त्यांनी नागरिकांची समजूत काढली.
Discussion about this post