नाशिक । नाशिकमधील आयकर विभागाच्या धाडीत अधिकाऱ्यांना मोठं घबाड सापडलं आहे. नाशिकमधील ८ शासकीय कंत्राटदारांचे घर व कार्यालयांवर आयकर विभागाच्या २०० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत छापे टाकले. यात सुमारे ८५० कोटींहून अधिक बेहिशेबी व्यवहार या धाडीत उघड झाले आहेत. आयकर विभागाच्या सलग पाच दिवस चाललेल्या छाडसत्रात ८ कोटींची रोकड आणि ३ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
आयकर विभागाच्या पथकाकडून शहरातील आठ शासकीय कंत्राटदारांची कार्यालये आणि निवासस्थानी हे छापा सत्र सुरु होतं. बेहिशोबी व्यवहारांची कागदपत्रे आयकर विभागाकडून जप्त केल्याची माहिती मिळत आहे.
राजकीय पक्षाशी संबंधित काही व्यक्तींच्या देखील या कंत्राटदारांकडे गुंतवणूक केल्याची कागदपत्रे विभागाला सापडली आहेत. या कारवाईनंतर कोणता राजकीय नेता आयकर विभागाच्या रडारवर येतो, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे.
नाशिक शहरातील बी. टी. कडलग, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार-पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन, सोनवणे बिल्डर्स या ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संबंधित कार्यालयांमध्ये चाैकशी केली होती.
Discussion about this post