नाशिक । राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या समवेत लवकरच बैठक घेण्यात येईल. अशी माहिती ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
मात्र, नाफेडला थेट बाजारात जाण्यासाठी तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यांना सरसकट कांदा खरेदी करणे शक्य नाही, असं मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच 2410 रुपये कांद्याचा निकष अगोदरच ठरला आहे. कांद्याने मागे किती रडवले, हे माहीत आहे ना? त्यामुळे सद्यस्थितीत 4 हजार पेक्षा जास्त भाव देणे प्रॅक्टिकल नाही.
केंद्राने कांद्यावरील निर्यात शुल्कात 40 टक्क्यांची वाढ केल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत. विशेषतः नाफेडच्या खरेदीवरूनही शेतकरी नाराज असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी या मुद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचे स्पष्ट केले.
गिरीश महाजन म्हणाले की, यंदा कमी पाऊसमान झाल्यामुळे भविष्यात कांद्याचे उत्पादन कमी होईल. कांद्याची निर्यात झाली, तर देशात कांदा टंचाई निर्माण होऊन कांद्याची भाववाढ होण्याची भीती नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेवून केंद्राने शेतकरी व ग्राहक हितास प्राधान्य देवून कांदा निर्यातीवर शुल्क आकारले आहे. पण त्यानंतरही शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी नाफेड व एन सी सी एफ यांच्यामार्फत 2410 रूपये प्रति क्विंटल दाराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केली जात आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात 40 कांदा खरेदी केंद्र सुरू असून अजून 10 खरेदी केंद्र वाढवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला करण्यात आल्या आहेत.
Discussion about this post