भारतीय रेल्वेच्या केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) सेवा आज पुना ठप्प झाली. यामुळे नवीन वर्षाच्या निमित्ताने घरी जाण्यासाठी तात्काळ तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फटका बसला. या महिन्यात तिसऱ्यांदा आयआरसीटीसीची सेवा ठप्प झाली असून प्रवाशांना तात्काळ तिकीट बुक करण्यात अडचणींचा सामना करावा लागला. पैसे भरण्यापासून ते गाड्यांच्या निवडीपर्यंत युजर्सना अॅप आणि वेबसाईटवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
डिसेंबर महिन्यातच आयआरसीटीसीची सेवा यापूर्वी दोनवेळा ठप्प झाली आहे. ही साईट आज ठप्प होण्याची ही तिसरी वेळ आहे. युजर्सना बराच वेळ डाउनटाईम मेसेज आयआरसीटीसीच्या साईटवर दिसत होता. अनेक युजर्सनी यावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर रेल्वेमंत्र्यांना टॅग करत तक्रार केली. यापूर्वी ९ डिसेंबर रोजी हाच मेसेज वेबसाइटवर सुमारे तासभर दिसला होता. यानंतर २६ डिसेंबर रोजी ही घटना घडली होती.
प्लॅटफॉर्मवरील डाउनटाइम मेसेजमध्ये म्हटले आहे की, “सर्व साइट्ससाठी पुढील एक तास बुकिंग आणि कॅन्सलेशन सेवा उपलब्ध नाही. कॅन्सिलेशन किंवा टीआरडी दाखल करण्यासाठी आपण कस्टम केअरला १३९ वर कॉल करू शकता. तिकिट बूक करतांना या संदेशामुळे अडचणी आल्या. याशिवाय अनेक युजर्सना साईट मेंटेनन्स मेसेज दाखवण्यात आला. साइटच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, त्यामुळे काही काळ सेवा बंद राहणार आहे. सध्या आयआरसीटीसीकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि सेवा बंद होण्याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही.
Discussion about this post