इराण- इराण- अमेरिका यांच्यात युद्धविराम झाल्यानंतरही तणाव कमी झालेला नसून इराणने संपूर्ण जगाला धक्का देणारा मोठा निर्णय घेतला आहे. इराणने पुन्हा एकदा होर्मुझ ही महत्त्वाची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा दिला आहे. परवानगीशिवाय आखातातून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले जाईल, असा कठोर इशारा इराणच्या नौदलाने दिला आहे.इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून आंतरराष्ट्रीय तेल पुरवठ्याला धोका निर्माण केल्याच्या आणि आखाती प्रदेशातील तणाव वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर इराणकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सागरी वाहतूक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, आखातातील जहाजांना पूर्वपरवानगीशिवाय होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडू नये असे संदेश सतत पाठवले जात आहेत. इराणने स्पष्ट इशारा दिला आहे की, जहाज मालकांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला लक्ष्य करून नष्ट केले जाईल. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतरही परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामानंतर दुसऱ्याच दिवशी इराणने मोठा निर्णय घेतला. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या पुरवठ्यावर टोल शुल्क आकारण्याची योजना आखली आहे. याचा अर्थ इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रचंड नफा कमावण्याची योजना आखली आहे. संपूर्ण जगाला होणाऱ्या कच्च्या तेल, एलपीजी आणि एलएनजीच्या पुरवठ्यापैकी २० टक्के पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. इराण आता या पुरवठ्यावर टोल कर आकारणार आहे.
दरम्यान, अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीला सर्वाधिक फटका बसला. अमेरिका आणि इस्राइलकडून होत असलेल्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती. ज्यामुळे जगभरातील सुमारे १८० तेलवाहू जहाजे अडकून पडली होती. संपूर्ण आखाती प्रदेशात १,००० हून अधिक जहाजे रांगेत उभी होती. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये तेल आणि इंधनाचे संकट निर्माण झाले होते. भारताला देखील याचा फटका बसला. यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला होता.















Discussion about this post