जळगाव । टाकाऊ प्लॅस्टीक पासून वीट तयार करणे, नैसर्गिक पॉलिमर पासून विविध वस्तू तयार करणे, मक्याचा कणसाचा दाणेविरहीत टाकाऊ भागापासून फरफ्युरल तेल तयार करणे, नारीशक्ती वाहन, मधमाशी प्रकल्प, प्लॅस्टीक पासून रोड तयार करणे अशा विविध विषयांवरील नवकल्पकता आणि संशोधनवृत्तीला चालना देणारे प्रकल्प विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या / संशोधक शिक्षकांच्या आविष्कार संशोधन स्पर्धेच्या निमित्ताने दिसून आले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशाळेतील विद्यार्थ्यांची आविष्कार संशोधन स्पर्धा शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी विद्यापीठात झाली. पदवीप्रदान सभागृहात सकाळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, डॉ. पवित्रा पाटील व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आविष्कार स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रा. पी.पी. माहुलीकर उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचे समन्वयक प्रा.जे.व्ही. साळी, डॉ. व्ही.एम. रोकडे, डॉ. एस. के. खिराडे आदींची उपस्थिती होती.
एकूण ४१० विद्यार्थी / संशोधक शिक्षक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये ३९२ पोस्टर्स व १८ मॉडेल्स यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगून विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन, वाणिज्य व व्यवस्थापन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सामाजिकशास्त्र, फार्मसी आदी विषयांमधील पोस्टर व मोड्युल्सची मांडणी सभागृहात केली होती. पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी व शिक्षक तसेच कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजनेतील संशोधक शिक्षक या गटातील स्पर्धक मोठया उत्साहाने आपले संशोधन सादर करीत होते. त्यांच्या या संशोधनात नाविन्यता तर होतीच मात्र भविष्यातील संशोधनाची बीजे देखील दिसून येत होती.
या स्पर्धेत इकोफ्रेन्डली किटकनाशके, व्हर्टीकल फार्मिंग, प्रदुषणावर उपाय, पर्यावरण शिक्षण, हिल वॉटर प्लॅन्ट, ज्ञान रचनेतून शब्द निर्मिती, पायथॉन साफ्टवेअर, फ्रि डायनामो उर्जा निर्मित करून विद्युत निर्माण करणे, गुलाबाच्या पाकळ्यांपासून किटकनाशक बनवणे, कोराना काळात रा.से.यो.चे योगदान, ताण तणावासाठी योगा, रिमोट व्होटींग पध्दती, संगणकाचा तंत्रज्ञानात वापर, इस्त्राईल हमास युध्द, आदिवासी जीवन पध्दती आदी विषयांवर पोस्टर व मॉड्युल्स विद्यार्थी व संशोधक शिक्षकांकडून सादर करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.जी.ए. उस्मानी यांनी केले. या स्पर्धेसाठी गठीत केलेल्या विविध समिती मध्ये सहभागी प्रशाळातील शिक्षक व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
Discussion about this post