जळगाव : आंतरराज्यीय चोरट्याला घरफोडीच्या गुन्ह्यात भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. १२ डिसेंबर २०२३ ला भडगावच्या विद्यानगरातील प्रकाश दत्तात्रय भोसले (वय ५९) यांचे बंद घर फोडून १० लाख ८६ हजार ४०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरीला गेले होते.
याबाबत भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. निरीक्षक पांडुरंग पवार, उपनिरीक्षक शेख डोमाळे, किरण पाटील, प्रवीण परदेशी, संदीप सोनवणे यांनी सात महिने तपास करून घरफोडी करणारा प्रशांत काशीनाथ करोशी (वय ३८, रा. इस्पुर्ली, ता. करवीर) याला वर्धा येथून अटक केली आहे. दहा लाखांच्या दागिन्यांपैकी पोलिसांनी ८ लाख ६४ हजारांचे सोने जप्त केले आहे.
आईचे सोने सांगून मोडले
संशयित प्रशांत करोशी याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेले सोने त्याने छत्तीसगढच्या सराफाला विक्री केले होते. माझ्या आईचे दागिने असून, मला आजारपण व बँकेचे हप्ते भरण्यासाठी पैसा लागत असल्याचे त्याने सराफाला सांगितले होते. चांदी बसमध्ये बसल्यावर रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्याचे त्याने सांगितले. चांदीचे वजनही जास्त असते आणि मोडायलाही त्रास होतो. कमी पैसे मिळतात, म्हणून चांदीचे दागिने नेहमी फेकून देतो, असे त्याने सांगितले.
जळगाव शहरात घरफोडीच्या बेताने पुण्यातून नाशिकमार्गे जिल्ह्यात शिरताना तो भडगावला पोचला. मात्र, उशीर झाल्याने त्याने प्रकाश भोसले यांच्या बंद घरातून अवघ्या पंधरा मिनिटांत दहा लाखांचा ऐवज चोरून नेला.
दरम्यान, चोरटा दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकत्ता, अशा मोठ्या शहरांमध्ये बंद घरे फोडतो. प्रवासासाठी एसी बोगी, पंचतारांकीत हॉटेल्समध्ये मुक्कामी राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, आजवर त्याने कर्नाटक आणि महराष्ट्रात जवळपास ५४ मोठ्या घरफोड्या केल्या आहेत. त्यातून एक ते दीड कोटीचा माल मिळविल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले.















Discussion about this post