भुसावळ । एकीकडे रेल्वे गाड्यांमध्ये अवैध फेरीवाल्यांचा त्रास वाढला असून त्यातच गाड्यांमध्ये प्रवाशांच्या साहित्यांची होत असलेल्या चोरीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशातच रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणाऱ्या सराईत चोरट्याला आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. महेश विनोद मराठे (१९, रा. बाभळदा, जि. जळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून मोबाइल आणि सोन्याचे दागिने असा ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१७ जानेवारीला १२१३८ पंजाब मेलच्या एस-२ कोचमधून एका महिला प्रवाशाची पर्स चोरीला गेली होती. त्यात २० हजारांचे सोन्याचे लॉकेट, दोन मोबाइल आणि तीन हजार रोख असा ५० हजारांचा मुद्देमाल होता. भुसावळ लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल होता. नंतर २४ जानेवारीला फलाट क्र. ३/४ वरून एका प्रवाशाचा ४३ हजार ७०० रुपयांचा मोबाइल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला. यामुळे यंत्रणा सतर्क झाली. १८ फेब्रुवारीला रात्री ८.१५ वाजता दक्षिण बाजूच्या रिक्षा स्टँडजवळ एका युवकाला ताब्यात घेण्यात आले. महेश मराठे असे त्याचे नाव असून त्याने दोन्ही चोऱ्यांची कबुली दिली. त्याच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या पथकाची कामगिरी, इतरही गुन्हे उघडकीस येणार
ही कारवाई आरपीएफ भुसावळच्या सीपीडीएस टीमचे हवालदार महेंद्र कुशवाहा, इमरान खान, सीआयबीचे एएसआय शिवानंद गीते, लोहमार्गचे हवालदार विलास जाधव आणि बाबू मिर्झा यांच्या पथकाने केली. संशयिताने प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन या चोऱ्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी दिली.















Discussion about this post