नवी दिल्ली । पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमध्ये घुसून ९ दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. या एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
या पत्रकार परिषदेमध्ये दोन महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या ऑपरेशनची माहिती दिली. त्याचसोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या ऑपरेशनची सविस्तर माहिती दिली.
कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी नष्ट झालेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचे फोटोंसह संपूर्ण तपशील शेअर केला आणि नऊ अड्ड्यांवरील हल्ल्यांमागील भारतीय सैन्याचा हेतू स्पष्ट केला. कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण घटनाक्रम सांगितल्या. त्या म्हणाल्या की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यातील नागरिक बळी आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. ‘पाकिस्तानवर पहाटे १.०५ वाजता हल्ला झाला. या कारवाईत ९ ठिकाणी हल्ले करण्यात आले. ही कारवाई मध्यरात्री १.०५ ते १.३० वाजेपर्यंत चालली. गुप्तचर माहितीच्या आधारे दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. दहशतवादी हल्ल्याच्या कट रचणाऱ्यांवर हा हल्ला केला.’
सोफिया कुरेशी पुढे म्हणाल्या की, ‘पाकिस्तान आणि पीओके दोन्हीवर हल्ले झाले. आम्ही नागरिकांना इजा पोहचवली नाही. आम्ही जैश आणि लष्करच्या छावण्यांना लक्ष्य केले. ९ ठिकाणी २१ लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानमधील ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण सियालकोट आहे. येथील सरजल छावणीवर हल्ला झाला. इथे हिजबुलची एक छावणी होती.’
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी यावेळी सांगितले की, ‘पहलगाम दहशतवादी हल्ला क्रूर होता. दहशतवाद्यांनी कुटुंबासमोर गोळ्या घातून हत्या केली. हल्लेखोर लष्कर ए-तोएबाशी संबंधित होते. हल्ल्यानंतर त्यांना माहिती देण्यास सांगण्यात आले. हल्लेखोरांचे पाकिस्तानी दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले. पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगभरात प्रतिष्ठा मिळवली आहे. पाकिस्तान जगाची दिशाभूल करत आहे. तो दहशतवाद्यांबद्दल खोटे बोलतो.’
Discussion about this post