नवी दिल्ली । केंद्रात सत्ता स्थापन्याच्या हालचालींना वेग आला असून NDA चे तिसऱ्यांदा सरकार येत आहे. नरेंद्र मोदी हे रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासह इतर काही नेते पदाची शपथ घेतील.
दरम्यान, महाराष्ट्रातून या मंत्रीमंडळात कोणकोण असेल याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. शिवाय कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याबाबतही तर्क लढवले जात आहेत. यातच मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील खासदारांची संभाव्य यादी समोर आली आहे.
महाराष्ट्रातून भाजपच्या दोन नेत्यांना केंद्रीय मंत्रीपद आणि दोघांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. यात पियूष गोयल, नितीन गडकरी, उदयनराजे भोसले, हेमंत सावरा, रक्षा खडसे या नेत्यांची चर्चा आहे. शिवसेनेचा एक खासदार मंत्रीपदाची शपथ घेईल. यामध्ये प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे या तीन नावांची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काही खासदार आग्रही आहेत, मात्र त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रीपद मिळू शकतं. यासाठी प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली जाऊ शकते. नरेंद्र मोदी यांच्यासोबत कोणते नेते शपथ घेतील हे उद्या सायंकाळी स्पष्ट होईल. मात्र, भारतीय जनता पक्ष घटक पक्षांचा योग्य सन्मान राखेल अशी चर्चा आहे.















Discussion about this post