जळगाव । चालत्या बसमध्ये एका टवाळखोराने इतर साथीदारांच्या मदतीने विद्यार्थिनींची छेड काढली. या प्रकारानंतर बसचालकाने बस थेट पोलीस स्थानकात आणली. मात्र बस पोलिसांच्या भीतीने घाबरलेल्या टवाळखोरांनी बसमधून उडी घेत पळ काढला आहे. याप्रकरणी टवाळखोर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव-नांदगाव या बसमध्ये (एम.एच. ८० वाय ५१९३) विद्यार्थी-विद्यार्थिनींसह प्रवाश्यांची गर्दी होती. बस आव्हाने फाट्याच्या पुढे गेल्यावर एका टवाळखोराने इतर साथीदारांच्या मदतीने बसमधील विद्यार्थिनींची छेड काढली. विद्यार्थिनींनी वाहकाकडे तक्रार केल्यानंतर वाहक लोटन पाटील यांनी टवाळखोराला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तो त्याच्या मित्रांसोबत बसमध्ये गोंधळ घालून विद्यार्थिनींसमोर चित्र-विचित्र हावभाव करून छेडखानी करत करत होता.
त्यानंतर विद्यार्थिनींनी होणार त्रास वाढल्याने वाहक चालक तुकाराम रायसिंग यांना बस तालुका पोलीस ठाण्यात नेण्याची सूचना केली. नांद्रा गाव एक किलोमीटरवर असतांना चालकाने बस गावात न नेता जळगावकडे फिरवली. पोलिसांच्या भीतीने घाबरलेल्या टवाळखोरांनी बस थांबविण्याची विनंती केली. चालकाने बस पोलीस ठाण्याकडे नेली. बस थांबत नाही म्हंटल्यावर तरुणाने पोलिसांना नाव सांगणाऱ्यांना चॉपर दाखवून धमकी दिली. आव्हाणे फाट्याजवळ तरुणाने चालत्या बसचा दरवाजा उघडून उडी मारली. इथून तो पसार झाला. विद्यार्थी, चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.