छत्रपती संभाजीनगर : मागच्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाचे थैमान घातले असून वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे. अशात मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह झालेल्या पावसात वीज पडल्यामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जनावरे देखील दगावली आहेत.
राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तर मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर घरावरचे परे देखील उडून गेल्याच्या घटना आहेत. तसेच वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मराठवाड्यात जीवितहानी होण्यासोबत वित्त हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे.
मराठवाड्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना बसला आहे. यात जालना जिल्ह्यातील १ हजार ९२३ बाधित क्षेत्र आहे. गेल्या महिन्यातही अवकाळी पावसामुळे ३ हजार ३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीचा अंतिम अहवाल अद्याप शासनाकडे गेलेला नाही. दरम्यान मराठवाड्यात वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर १४ जनावरे देखील दगावली आहेत.
मे महिन्यांतील १२ पैकी ७ दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे मक्यासह अन्य उन्हाळी पिकांना फटका बसला. तसेच फळबागादेखील बाधित झाल्या आहेत. प्राथमिक अहवालानुसार विभागातील १७ हेक्टर जिरायत क्षेत्र, १ हजार ४८० हेक्टरवरील बागायत आणि १ हजार १८ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला आहे.
Discussion about this post