जळगाव । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला असून शासन आपल्या दारी या सरकारच्या उपक्रमावरही अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर प्रचंड खर्च केला जात आहे. मात्र या कार्यक्रमांचा लोकांना खरंच फायदा होत आहे का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हे सगळं घडतंय
राज्यातील राजकारणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, आज निव्वळ राजकारण चाललं आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही. विरोधकांना साईड ट्रॅक केलं जात आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हे सगळं घडत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
सध्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. जातीय तणाव निर्माण होत आहेत. दोन ते तीन महिन्यात दहा ते बारा घटना घडल्या आहेत. मी कोणत्याही घटनेचे समर्थन करणार नाही. महाराष्ट्र पुरोगामी विचारधारेचा आहे, असंही अजित पवार म्हणाले.
शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. महागाई, शेती मालाला भाव नाही यावरून लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे चाललंय का? सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. सरकार 20 जणांचं आहे, कमी मंत्र्यांमध्ये काम सुरू आहे. एकाच मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कारभार आहे, त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
Discussion about this post