जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. अशातच जळगावातील समता नगर मधील बंद घर फोडून घरातील चांदीच्या वस्तूसह रोकड मिळून एकूण 81 हजारांचा ऐवज चोरीस नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाढत्या चोर्या-घरफोड्यांनी नागरीक धास्तावले आहेत.
प्रतिभा चंद्रकांत बनसोडे (40, रा.राजू किराणा दुकानासमोर, समता नगर, जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 6 जानेवारी रोजी कामानिमित्ताने त्या बाहेर गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटातील 71 हजारांची रोकड व 10 हजारांच्या चांदीच्या पाटल्या असा एकूण 81 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवण्यात आला. शनिवारी दुपारी अडीच वाजता प्रतिभा बनसोडे या घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला.
त्यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर सायंकाळी सात वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे हे करीत आहे.















Discussion about this post