जळगाव : संपूर्ण भारतासाठी अभिमान वाटावा अशा ‘चांद्रयान-3’ने आकाशात झेप घेतली. ‘इस्रो’च्या या मोहिमेमध्ये जळगाव जिल्ह्यातील हातेड या गावातील संजय गुलाबचंद देसरडा यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरलेली आहे.
संजय हे गेल्या २० वर्षांपासून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते या मोहिमेसाठी कार्यरत होते. अवकाशात सोडल्या जाणाऱ्या तीन प्रकारचे यानासाठी इंधन अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.
यानाचे पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि काल प्रक्षेपित झालेल्या यानात एलव्हीएम-३ मध्ये द्रव (लिक्विड) लागत असते. यात वरिष्ठ शास्त्र म्हणून इस्त्रोकडून जबाबदारी त्यांना देण्यात आलेली होती. यापूर्वी संजय देसरडा यांनी मंगळयान, चांद्रयान-२, चांद्रयान-३ याव्यतिरिक्त अनेक मोहिमेत महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावलेली आहे.
हातेड ते इस्त्रो हा प्रवास आपल्यासाठी अनुभवांनी भरलेला होता, असे संजय म्हणतात. संजय यांच्या परिवारात त्यांची पत्नी चित्रा या गृहिणी आहेत, तर मोठी कन्या ऊर्जा आणि लहान मुलगा आयुष हा बारावीमध्ये असून, तो देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शास्त्रज्ञ म्हणून आपले करिअर करणार, अशी त्याची इच्छा आहे.