जळगाव । जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या वडनगरी फाटा येथे बडे जटाधारी महादेव मंदिर ट्रस्टतर्फे शिवमहापुराण कथा आजपासून ५ ते ११ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात असून यासाठी पंडित प्रदीप मिश्रा यांचे रात्री जळगावमध्ये आगमन झाले आहे. दरम्यान, कथेच्या पाश्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
कथेच्या ठिकाणी जाण्यासाठी जळगाव तसेच चोपड्याकडून येणाऱ्या मार्गावर वाहनतळ तयार केले आहे. त्याठिकाणी वाहने उभी करून कथास्थळी पायी जावे लागणार आहे.
शहरात आयोजीत केलेल्या शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर कथास्थळासह मार्गावर तसेच परिसरात पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. कथास्थळासमोर व्हीआयपी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या बाजूला कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनांचे वाहनतळ राहणार आहे. या परिसरात पोलिस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कथास्थळी जाणाऱ्या मार्गावर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर पार्कंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्याठिकाणाहून कथा स्थाचे अंतर हे साधारण दीड ते दोन किलोमिटर पर्यंतचे आहे. त्यामुळे भाविकांना हे अंतर पायीच पार करावे लागणार आहे.
जळगावातील शिवाजीनगर उड्डाणपुलावरून आव्हाणा फाटा, खेडी फाटा या मार्गे भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, पहूर, धुळे या भागातील भाविकांना कथास्थळी जाता येणार आहे. या मार्गावर चार ठिकाणी वाहनतळ असून आव्हाणा फाट्याच्या अलीकडे दुचाकी व तीन चाकी वाहनांसाठी तर फाट्याच्या पुढे बस, टेम्पो व त्याच्या बाजूला कारसाठी वाहनतळ तयार केले आहे. या शिवाय खेडी फाट्यानजीक कारसाठी चौथी पार्किंग तयार केली आहे.
तरसोद फाट्यावरून बायपासकडून ममुराबादमार्गे कथास्थळी पोहचता येणार आहे. यासाठी या मार्गावर तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरुवातीला बस, टेम्पो उभे राहतील. त्यानंतर पुढे कार आणि त्यानंतर पुढे दुचाकी आणि तीन चाकी वाहने उभे करता येतील.
चोपड्याकडून येणाऱ्या मार्गावर कथास्थळाकडे येताना डाव्या बाजूला चार पार्किंग असून सुरुवातीला दोन ठिकाणी कार त्यांनतर बस, टेम्पो व शेवटी दुचाकी व तीन चाकी वाहने उभी करता येतील. या शिवाय या रस्त्याच्या उजव्या बाजूला पार्किंगसाठी तीन ठिकाणी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
Discussion about this post