पुणे । राज्यात अद्यापही अवकाळी पावसाचे संकट असून अनेक ठिकाणी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघरसह अर्ध्या महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटही होण्याची शक्यता आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने (Heavy Rain) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांना अवकाळीने झोडपून काढलं आहे. सोसाट्याचा वारा असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झालाय. अजूनही जवळपास ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकाद मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघरला पावसाचा इशारा दिला आहे. रायगड आणि कोकणातील काही भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिसरात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
याशिवाय पुणे, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. विदर्भ मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर बीड, जालना, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, अकोला, वाशिम वादळी वारा अन् मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.















Discussion about this post