नंदुरबार : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या आचारसंहिता सुरु आहे. या काळात पोलिसांकडून धडक कारवाया केल्या जात असून अशातच शहादा तालुक्यातील नागझिरी गावाजवळ म्हसावद पोलिसांनी मध्यप्रदेश राज्यात तयार केलेला विना परवाना मद्यसाठा जप्त केला. साधारण २ लाख ४७ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारच्या जिल्हा पोलिस अधीक्षक श्रावण दत्त यांना मिळालेल्या माहितीनुसार म्हसावद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांनी नागझिरी गावाजवळ असलेले उकलापाणी येथे बिजला तेजला वळवी यांच्या घराजवळ रतिलाल आलम भिल हा दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने मुद्देमाल लपवीत होता. माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकली असता त्याठिकाणी २ लाख ४७ हजार २०० रुपये किमतीचा पॉवर कुल स्ट्रॉंग बियर असे लिहिलेले १०३ बॉक्स आढळून आले.
पोलिसांच्या पथकाने हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून या पथकात पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, जमादार सुनिल बागुल, हवालदार जितेंद्र पाडवी, रामदास पावरा, अजित गावित, राकेश पावरा, दादाभाई साबळे, उमेश पावरा, वसंत वसावे, सचिन तावडे यांचा सहभाग होता. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची मोठी कारवाई मानली जात आहे.