चाळीसगाव । येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकावर पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडील विमल गुटख्याच्या १८ गोण्यांसह इको वाहन असा मिळून सुमारे ९ लाख २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अक्षय गुलाब कोतकर (वय २४, रा. गुरूवर्य नगर, तिरंगा पुलाजवळ, चाळीसगाव) याला मुद्देमाल व वाहनासह पोलिस ठाण्यात आणले.
याबाबत माहिती अशी, शहरातील तिरंगा पुलावरून इको वाहनातून प्रतिबंधित विमल गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.
त्यानुसार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर व सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. पाटील यांनी उपनिरीक्षक योगेश माळी, पंढरीनाथ पवार, भूषण पाटील, भटू पाटील, मनोज चव्हाण यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, वरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुलावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली.
रात्री सव्वा दहाच्या सुमारास इको वाहन (क्रमांक- एम.एच. १९ ईओ ३९५८) येताना दिसली. तिची तपासणी केली असता, त्यात लहानमोठ्या अशा १८ गोण्या आढळून आल्या. सुरवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांचा संशय बळावल्याने, त्यांनी गोण्यांची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला, मानवी आरोग्यास घातक व अपायकारक असलेला विमल (गुटखा) पान मसाला व सुगंधित तंबाखू मिळून आली. याप्रकरणी अक्षय गुलाब कोतकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.















Discussion about this post