इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स हे फिचर खूप प्रसिद्ध आहे. आपले रील्स व्हायरल व्हावेत यासाठी युजर्स वेगवेगळ्या कल्पना वापरून हटके रील्स बनवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यातून कधीकधी विचित्र घटनाही घडताना पाहायला मिळतात. पतीने रील्स बनवायला विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने आपल्या माहेरच्या लोकांच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केला. ही धक्कादायक घटना बिहारमधील बेगूसराय इथं घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोदाबंदपूर येथील फफौत गावात ही हत्येची घटना घडली आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेला महेश्वर कुमार राय याचं सहा ते सात वर्षांपूर्वी फफौत येथील तरुणीशी लग्न झालं होतं. महेश्वर हा कामानिमित्त कोलकाता इथं राहत होता. मात्र सुट्टी असल्याने तो नुकताच घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने पत्नी राणी हिला इन्स्टाग्रामवर रील्स बनवू नको, असं सांगितलं.
मात्र राणीला महेश्वरची ही मागणी मान्य नव्हती. काहीही झालं तरी मी रील्स बनवणारच, असं तिने निक्षूण सांगितलं. त्यानंतर पती-पत्नीत वाद होण्यास सुरुवात झाली. महेश्वर हा फफौत या आपल्या सासुरवाडीत गेला होता. मात्र तिथं राणी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी महेश्वरची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप आहे. रात्री साडेदहा वाजता कोलकाता इथं काम करणाऱ्या महेश्वरच्या रुदल नावाच्या भावाने त्याला फोन केल्यानंतर महेश्वरचा फोन दुसऱ्याच कोणीतरी उचलला. त्यामुळे शंका आल्याने रुदल याने आपल्या वडिलांना महेश्वरची सासुरवाडी असलेल्या फफौत इथं जाण्यास सांगितलं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महेश्वर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आणि त्याची पत्नी राणी हिला ताब्यात घेतलं. सध्या पोलिसांनी राणीची चौकशी सुरू असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.















Discussion about this post