जळगाव । हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसला नाशिक येण्यापूर्वी उडवण्याची धमकी ट्विटर वरून रेल्वे पोलिसांना मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. यानंतर जळगाव पोलीस दल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव स्थानकावर मुंबई हावडा गाडीची दोन तास तपासणी करण्यात आली. पंरतु तपासणीवेळी कोणत्याही प्रकारची संशयित वस्तू न आढळून आल्यामुळे गाडी पुढे रवाना करण्यात आली.
याबाबत असे की, मुंबई हावरा मेलमध्ये बॉम्ब असल्याची ट्विटरवरून धमकी देण्यात आली होती. मुंबईकडे जाणाऱ्या 12809 हावडा – मुंबई मेल या रेल्वे गाडीमध्ये टायमर बॉम्ब ठेवला आहे, अशी धमकी रेल्वे विभागाला ट्वीटवर देण्यात आली. मुंबई हावडा मेल गाडीत नाशिकच्या आधी मोठा बॉम्बस्फोट करण्याची धमकी यामध्ये देण्यात आली.
धमकीनंतर जळगाव रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून जळगाव रेल्वे स्थानकावर मुंबई हावडा रेल्वे गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. पहाटे 4:17 मिनिटांनी जळगाव रेल्वे स्थानकावर 12809 हावडा – मुंबई मेल ही गाडी थांबवून रेल्वे सुरक्षा बल व बॉम्ब शोधक पथकाकडून गाडीतील प्रत्येक डब्बाची तपासणी करण्यात आली.
पूर्ण रेल्वे गाडीच्या तपासणीनंतर 6 वाजून 28 मिनिटांनी रेल्वे पुढच्या प्रवासाला मार्गस्थ करण्यात आली. Fazluddin Nirban या नावाच्या ट्विटर अकाउंट वरून रेल्वेत विभागाला धमकीचा मेसेज आला होता. याबाबत रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु कऱण्यात आला.