मुंबई । देशात सध्या बेरोजगारीचा विषय गंभीर आहे. उच्च शिक्षण घेऊनही अनेक तरुण तरुणी बेरोजगार आहे. सरकारकडून बेरोजगांसाठी विविध पाऊले उचलली जात आहे. यातचकौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिकांच्या वर्गांचे ऑनलाईन उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज चाळीस हजार विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो. नव्याने सुरू झालेल्या ७५ आभासी क्लासरूम आणि आज सुरू झालेल्या अभ्यासिका यांचा विद्यार्थी लाभ घेवून स्वविकास करतील, अशी मला आशा आहे.
दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार दिला
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया व डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले असून, देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर राज्यात देखील कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार प्राप्त झाला असून, कौशल्य विकास प्राप्त युवकांना भविष्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उद्योजकतेला लागणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान लक्षात घेऊन आयटीआयमध्ये विविध ९०० कोर्सेस शिकवले जातात, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.















Discussion about this post