जळगाव । जळगाव शहरात एका डॉक्टरच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने पैसा, आणि रोकडवर डल्ला मारल्याची घटना ताजी असतानाच तशीच आणखी एक घटना समोर आली आहे. रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेल सिल्व्हर पॅलेस हॉटेलमधील नोकरानेच एप्रिल ते डिसेंबर दरम्यान ८ लाख १४ हजारांची रोकड चोरी केल्याची घटना घडली आहे. आदित्य सुनील वाघ असं चोरी करणाऱ्या नोकराचे नाव असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेल सिल्व्हर पॅलेस नावाचे नामांकित हॉटेल आहे. हॉटेलमध्ये दररोज जमा होणारी रक्कम लॉजिंग काऊंटरच्या व्यवस्थापकाकडे जमा करण्यात येते. २८ डिसेंबर रोजी विनोद एजन्सीचे व्यवस्थापक योगेश महाशब्दे यांनी कामगार आदित्य सुनील वाघ याने नेहमीप्रमाणे हॉटेलमधून आणलेली १ लाख ३५ हजारांची रोकड जमा करून घेतली.
काही वेळाने हॉटेल सिल्व्हर पॅलेस रेस्टॉरंट्चे व्यवस्थापक संजय पेंदोर यांनी महाशब्दे यांना फोन करून रक्कम जमा केली का? याबाबत विचारणा केली. महाशब्दे यांनी आदित्य वाघ याला फोन केला असता ४५ हजारांच्या रोकडचे पाकीट चुकून बॅगेमध्ये राहिल्याचे सांगितले. रक्कम थोड्या वेळाने आणून आदित्य याने योगेश महाशब्दे यांच्याकडे जमा केली. योगेश याला सदर बाब संशयास्पद वाटल्याने त्याने प्रकार मालकांना सांगितला.
मालकांनी एप्रिल 2024 पासून हॉटेलच्या सर्व व्यवहारांची तपासणी केली असता दर महिन्याला काही काही दिवसांनी थोडी थोडी रक्कम कमी असल्याचे निर्देशित झाले. तपासणीतून आदित्य सुनील वाघ याने या कालावधीत नोकर या नात्याने त्याच्याकडे विश्वासाने दिलेली ८ लाख १४ हजार रुपयांची रक्कम योगेश महाशब्दे आणि हर्षल बागुल यांच्याकडे जमा न करता अपहार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post