कोल्हापूर : कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी औरंगजेबचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर तेथील हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असून त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. संपूर्ण शहरात अत्यंत कडक बंदोबस्त तैनात केला असून घोषणाबाजी करत आक्षेपार्ह स्टेटस लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले होते.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.
नेमकं काय घडलं?
कोल्हापुरातील काही तरुणांनी औरंगजेबाविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दुपारी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या दारात जमा झाले. तिथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्या समाजकंटकांना तातडीने अटक करून कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर जमाव शहरातील टाऊन हॉल, बिंदू चौक व इतर काही भागांत गेला.
तिथे त्यांनी हातगाड्या व इतर काही वाहने, दुकानांची तोडफोड केली. यामुळे शहरात तणाव वाढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची मोठी कुमक बोलाविण्यात आली. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमारही केला. सायंकाळपर्यंत शहरात तणावाची परिस्थिती कायम होती.
Discussion about this post