जळगाव । राज्यातील अनेक भागात तापमान वाढीने उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे नागरिक हैराण झाले. मात्र दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असून पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस कोसळताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात शनिवारी आणि रविवारी अवकाळी पावसाचा जोर वाढणार, असा इशारा दिला आहे. खान्देशमध्ये वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
या भागात पावसाचा इशारा
येत्या २४ तासांत कोकण किनारपट्टीसह, विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि खान्देशमध्ये वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने रविवारी चंद्रपूर जिल्ह्याला गारपीटीसाठी आणि पुणे, लातूर, नांदेड तसेच सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरात देखील अवकाळी पावसाच्या सरी बरसतील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.पुणे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे वगळता अन्य जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी, १३ मे रोजी उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
यादरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. राज्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. काढणीला आलेली पिके झाकून ठेवावीत, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.















Discussion about this post