देशात ऐन हिवाळ्यात पाऊस धिंगाणा घालताना दिसत आहे. मिचाँग चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
येत्या २४ तासांत महाराष्ट्रासह, १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही राज्यांमध्ये गारपीट होऊ शकते, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
स्कायमेट वेदरच्या अहवालानुसार, आज ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढू शकतो. पुढील ४८ तासांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस पडू शकतो. झारखंड, बिहारचा काही भाग, दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही प्रमाणात हलका पाऊस पडेल. ८ आणि ९ डिसेंबरला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Discussion about this post