नवी दिल्ली : भारतात सध्या कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आहे. आता उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्रातील विदर्भ, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्ण वाऱ्यांचा प्रकोप वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील चार दिवस ओडिशा, विदर्भाच्या काही भागात जोरदार उष्ण वारे वाहतील. यासोबतच पश्चिम बंगाल, झारखंडमध्ये उष्णतेचा प्रकोप पुढील तीन दिवस अधिक राहील. कोस्टल आंध्र प्रदेश, यनम, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि पूर्व मध्य प्रदेश पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेखाली असतील. तर तेलंगणा, तामिळनाडू, पश्चिम मध्य प्रदेशात पुढील २४ तास खूप उष्ण असेल.
बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेने विक्रम मोडला
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 12वीपर्यंतच्या शाळा 24 जूनपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेने गेल्या 11 वर्षांचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी 2012 मध्ये 19 दिवस सतत उष्णतेची लाट होती. यावेळी 20 दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये 17 जूनपर्यंत शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. गोवा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्येही कडक उन्हामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत.
या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे
बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राजस्थानच्या नैऋत्य आणि आग्नेय भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ईशान्य राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. सोमवार आणि मंगळवारी पश्चिम मध्य प्रदेश आणि दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता आहे. आज उत्तर गुजरातच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील काही दिवस ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Discussion about this post