जळगाव । गेल्या १५ ते २० दिवसाच्या खंडानंतर जळगाव जिल्ह्यासह पाणलोट क्षेत्रात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने हतनूरच्या पाणी पातळी चांगली वाढ झाली. परिणामी हतनूर धरण पातळीत झालेली वाढ लक्षात घेऊन आज दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणातून ५६४३३.३७ क्युसेक्स इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
मागच्या काही दिवसापासून आवक कमी झाल्याने हतनूरचे बहुतांश दरवाजे बंद करून केवळ दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले. मात्र, आता पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणातील उपयुक्त पाणी साठा झपाट्याने वाढताना दिसून आला आहे.
आज धरणाचे ४१ पैकी ४ गेट पूर्णपणे व १६ गेट प्रत्येकी १ मीटरने उघडण्यात आले. दरम्यान, हतनूर धरणाचा विसर्ग वाढल्यानंतर खाली शेळगाव येथे तापी नदीवर उभारलेल्या बॅरेजचेही अनेक दरवाजे आता उघडण्यात आले आहेत. यामुळे वाढता विसर्ग लक्षात घेता तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान तापी व पूर्णा नदीकाठी राहणाऱ्या गावातील नागरिकांनी नदीकाठावर न जाणे, पोहणे, मासेमारी करणे तसेच गुरे-ढोरे बांधणे टाळावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी दक्षता बाळगावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post